लातूर- कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाची किंमत ठरवता येणार आहे. विरोधकांकडे कोणता मुद्दाच नसल्याने ते या कायद्याचा विरोध करत आहे. परंतु, शेतकरी समाधानी असून या कायद्यामुळे शेतकऱ्यांनी शेती मालाचा 'काटा' केल्यावर त्यांना 'नोटा' मिळणार असल्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ज्या काँग्रेसकडून कायद्याला विरोध होत आहे, त्यांच्याच जाहीरनाम्यात कृषी विधेयकाचा उल्लेख होता. मात्र, आता त्यांच्याकडूनच विरोध होत आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या हिताचे कोण, हे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात येत असल्याचेही दानवे म्हणाले. दानवे हे शेतकऱ्यांना कृषी कायद्याचे फायदे समजून देण्यासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले.
शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने केंद्र सरकार निर्णय घेत आहे. कृषी कायद्यांना विरोध होत असला तरी, शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार मिळणार आहे. तसेच, अनेक कंपन्या शेती व्यवसायात गुंतवणूक करण्यास तयार असून त्याचा देखील फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. विरोधकांकडे कोणता मुद्दाच नसल्याने त्याच्याकडून अशाप्रकारे विरोध केला जात आहे. गेल्या ५ वर्षांत प्रत्येक शेतीमालाचा दर वाढलेला आहे. शिवाय हमीभावाच्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी तरला आहे. त्यामुळे या नव्या धोरणामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार असल्याचा दावा दानवे यांनी केला.