महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ओेएलएक्स'वरुन मागवली दुचाकी; पदरी पडली फक्त बनावट कागदपत्रे - आर.सी. बुक

लातुरात एका तरुणाला दुचाकी खरेदी करण्याच्या नादात तब्बल ४१ हजाराला गंडा बसला आहे. 'ओएलएक्स' या ऑनलाईन साईटवरून त्याने दुचाकी मागवली. मात्र, पदरी केवळ दुचाकीची कागदपत्रे पडली असून त्याची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

ओएलएक्सवरून दुचाकी मागवली पण मिळाली केवळ बनावट कागदपत्रे

By

Published : Jun 7, 2019, 11:57 AM IST

लातूर- दिवसेंदिवस ऑनलाईनद्वारे वस्तू खरेदीवर सर्वांचाच भर आहे. विशेषतः तरुणाईला ही प्रक्रिया अधिक सोयीची असल्याचे वाटते. मात्र, लातुरात एका तरुणाला अशाच प्रकारे दुचाकी खरेदी करण्याच्या नादात तब्बल ४१ हजाराला गंडा बसला आहे. 'ओएलएक्स' या ऑनलाईन साईटवरून त्याने दुचाकी मागवली. मात्र, पदरी केवळ दुचाकीची कागदपत्रे पडली असून त्याची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

युवकाने गुगल पे अकाऊंटवरून पाठवले पैसे

लातूर येथे सेल्समन म्हणून काम करणारे गणेश पाचंगे यांनी ओएलएक्सवर ७ महिन्याची दुचाकी विक्रीस असल्याची जाहिरात १ जून ला पाहिली. त्यामुळे पाचंगे यांनी संबंधित जाहिरातीवर दिलेल्या नंबरशी संपर्क साधून अधिक माहिती घेतली. यावेळी मोबाईलवरून बोलणाऱ्या व्यक्तीने गाडीचा नंबर एमएच १४ एचइ ८८०२ असून गाडीमालकाचे आधारकार्ड, गाडीचे आर. सी बुक, आर्मी कार्ड पाठवून स्वतःचे नाव किसन मोरे असे सांगितले होते.

त्यानुसार पाचंगे यांनी किसन मोरे यांच्या खात्यावर गूगल पे अकाउंटवरून ४१ हजार रुपये पाठवले आणि २ जूनपर्यंत सर्व व्यवहारही झाला, तर आता प्रत्यक्षात गणेश पाचंगे यांना दुचाकीचे वेध लागले होते. परंतु त्यांचे हे स्वप्न हवेतच विरत असताना दिसत आहे. कारण मागील ४ दिवसांपासून संबंधित किरण मोरे यांचा मोबाईल बंद असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय पाचंगे यांना पाठवण्यात आलेली कागदपत्रेही खोटी असल्याचे समोर आले आहे.

मागील ४ दिवसापासून पाचंगे हे त्या व्यक्तीची फोनची वाट पाहत होते. परंतु, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ओएलएक्सद्वारे ऑनलाईन दुचाकी खरेदी करण्यात फसवणूक झाल्याची तक्रार त्यांनी गांधी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी गणेश पाचंगे यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details