लातूर - पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुढील नियोजनासाठी शुक्रवारपासून भाजपच्या बैठका पार पडत आहेत. लातूरमध्ये पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांच्या अनुपस्थितीची जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे. पुन्हा तिकिट न मिळाल्याने सुनील गायकवाड हे नाराज असल्याचे चित्र दिसून येत आहे.
भाजपच्या पहिल्याच बैठकीला खासदार सुनील गायकवाडांची दांडी - latur bjp
उमेदवारी मिळाली नसली तरी पक्षश्रेष्ठींचे आदेश पाळणार असल्याचे सांगणारे खासदार सुनील गायकवाड नेमके पहिल्याच बैठकीला गैरहजर असल्याने जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
लातुरमधून खासदार सुनील गायकवाड आणि सुधाकर श्रृंगारे यांच्यापैकी उमेदवारी कुणाला मिळेल याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. गुरूवारी रात्री लातूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून जि. प. सदस्य सुधाकर श्रृंगारे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार कार्यकर्त्यांच्या बैठका आणि गाठी-भेटीवर जोर देण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठक घेऊन प्रचार यंत्रणा राबविण्याबाबत संभाजी पाटील आणि अभिमन्यू पवार यांनी त्यांना कानमंत्र दिला आहे. यावेळी सुनील गायकवाड यांची उपस्थिती नव्हती. त्यामुळे गायकवाडांना डावलून प्रचार यंत्रणा राबवली जात आहे, की त्यांनीच या बैठकीला दांडी मारली, याची चर्चा रंगू लागली आहे.
उमेदवारी मिळाली नसली तरी पक्षश्रेष्ठींचे आदेश पाळणार असल्याचे सांगणारे खासदार सुनील गायकवाड नेमके पहिल्याच बैठकीला गैरहजर असल्याने जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. याबाबत गायकवाड यांना संपर्क साधला असता बाहेरगावी असून उशिरा बैठकीला येणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे नगरसेवक, जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली असून कमी काळात प्रचार यंत्रणा राबवायची कशी याबाबत चर्चा झाल्याचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सांगितले.