लातूर - महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या दोन नगरसेवकांनी चक्क काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करून सत्तांतर घडवून आणले आहे. विधानसभा निवडणुकीत सहा विधानसभा मतदार संघांपैकी केवळ दोन जागांवर यश मिळाल्यानंतर आता भाजपाला लातूर महापालिकाही गमवावी लागली आहे. यासाठी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी 'हमें तो अपनो ने लूटा' असे म्हणत आपल्याच पक्षातील काहींना जबाबदार धरले आहे.
२०१७च्या महापालिका निवडणुकीत सर्व ३६ नगरसेवक निवडून आल्याने भाजपला अभुतपुर्व यश मिळाले होते. मात्र, विधानसभा निवडणुकांपासून पक्षातील अंतर्गत गटबाजीचा फटका पक्षाला बसत आहे. त्यामुळेच उदगीर आणि अहमदपूर मतदारसंघात भाजपला पराभव स्विकारावा लागला होता. याशिवाय औसा मतदार संघातही संभाजी पाटील आणि अभिमन्यु पवार यांच्यातील शीतयुद्ध जिल्ह्याने पाहिले आहे. गेल्या चार वर्षात पक्षाच्या संघटनात्मक कामाला तडा गेला असल्यानेच संभाजी पाटील यांनी 'हमें तो अपनो ने लूटा' असे विधान केले असल्याची चर्चा आहे.