लातूर - जिल्ह्यात दिवसाला कोरोनाचे 6 ते 7 रूग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जनतेला दिलासा आणि पाठबळ देण्याचे काम हे पालकमंत्र्याचे असते. मात्र, लातूरच्या पालकमंत्र्यांचा ना प्रशासकीय अधिकाऱ्यांची संपर्क आहे ना जनतेशी. कोरोनाच्या महामारीत ते स्वतःची काळजी घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे मात्र, त्यांनी जनतेचीही विचारपूस करावी, असा टोला आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमित देशमुख यांना लगावला. फिजिकल डिस्टन्सच्या नावाखाली पालकमंत्री जनतेपासून अलिप्त असल्याचा आरोप होत आहे.
आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूरमध्ये एक पत्रकार परिषद घेतली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केलेली मदत आणि स्थानिक पातळीवर राज्य सरकारचे अपयश या अनुषंगाने संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, शहराध्यक्ष गुरुनाथ मगे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे हे उपस्थित होते.
कोरोना संकट काळात केंद्र सरकार आणि राज्य सरकारची मदत यावरून मतभेद निर्माण होत आहेत. सध्या सुरू असलेली धान्य केंद्र, पीपीई किट उत्पादन, कोरोना नमुने तपासणीच्या लॅब यांना केंद्रामुळेच मंजुरी मिळाली आहे. याचे श्रेय कोणीही घेत असेल तर ते दुर्दैवी आहे. हा काळ एकत्र येऊन लढण्याचा आहे. आत्तापर्यंत भाजपने संघटीत होत देशात 19 कोटी फूड पॅकेटचे वाटप केले आहे. 20 कोटी मास्क वाटले आहेत तर 4 कोटी 86 लाख नागरिकांना धान्य दिले असल्याचे संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.
जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख ना प्रशासनाच्या संपर्कात आहेत ना जनतेच्या संपर्कात आहेत. स्वतःची काळजी घेत असताना पालक या नात्याने लातूरच्या जनतेचाही विचार करणे आवश्यक असल्याचे संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले. अनलॉक 1 घोषित केल्यानंतर पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा म्हणजे राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका त्यांनी केली. अद्यापही कोरोनाचे संकट टळलेले नाही. त्यामुळे जनतेने स्वतःची काळजी स्वतःच घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाला सतर्क राहण्याचे आवाहन संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे.