लातूर -शाळा सुटल्यानंतर स्कूल व्हॅनमधून घरासमोर उतरलेल्या सहा वर्षीय चिमुकलीचा व्हॅनच्या चाकाखाली आल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे गुरूवारी सायंकाळी घडली. गायत्री हंगे (वय ६) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. व्हॅनमधून उतरल्यानंतर गायत्री नेमकी कोणत्या बाजूने आहे हे वाहन चालकाच्या लक्षातच आले नाही. त्यामुळे व्हॅन पुढे घेत असताना ती थेट चाकाखाली आली.
लातुरात स्कूल व्हॅनच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू; १० दिवसांपूर्वीच घेतला होता शाळेत प्रवेश
गायत्री हंगे (वय ६) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. व्हॅनमधून उतरल्यानंतर गायत्री नेमकी कोणत्या बाजूने आहे हे वाहन चालकाच्या लक्षातच आले नाही. त्यामुळे व्हॅन पुढे घेत असताना ती थेट चाकाखाली आली.
गेल्या १० दिवसांपासूनच या चिमुकलीने शाळेत जाण्यास सुरुवात केली होती. गायत्री ही किनगावातील आयडियल इंग्लिश स्कुलमध्ये इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण घेत होती. नेहमीप्रमाणे ती स्कूल व्हॅनमधून गुरूवारी सायंकाळीही घराकडे परतली. मात्र, व्हॅनमधून उतरून ती कोणत्या बाजूने घराकडे निघाली आहे, हे वाहन चालकाच्या लक्षात आले नाही. यामध्येच तिला जोराची धडक बसली.
गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या गायत्रीस उपचारासाठी लातूरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान रात्री उशीरा तिचा मृत्यू झाला. सकाळी शवविच्छेदन करण्यात आले असून दुपारी तिच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. हसतमुख असणाऱया चिमुकलीच्या अपघाती निधनामुळे गायत्रीच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. किनगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी कायदेशीर कारवाई करीत आहेत.