लातूर- गेली तीस वर्षे ज्या भाजपाला राज्यात शिवसेनेने मदत केली, त्याचा विसर त्यांना पडला आहे. राज्यात भाजपाला नवसंजीवनी देण्याचे काम शिवसेनेने केले आहे. मात्र, आता केंद्र सरकारकडून सावत्र भावासारखी वागणूक दिली जात आहे. हे सर्व जनतेच्या लक्षात येत असल्याची टीका राज्य महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. तसेच वेळप्रसंगी कर्ज काढून हे सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. त्याअनुषंगाने लवकरच कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यात अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसान पाहिणीचे दौरे सत्ताधारी आणि विरोधकांकडून केले जात आहेत. परंतु, यामध्ये राज्य सरकार मदत करणार की केंद्राचे सहकार्य राहणार यावरून राजकारण तापू लागले आहे. राज्यसरकारलाही कर्ज काढून मदत करणे सहज शक्य आहे. पण त्यासाठी आवश्यक असलेली इच्छाशक्ती नसल्याने केंद्राकडे बोट दाखवले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मात्र, राज्यात महाविकासआघाडी सरकारची सत्ता स्थापन झाल्याने केंद्राकडून सावत्र पणासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप सत्तार यांनी केला. शेतकऱ्यांच्या कैवारी कोण हे जनतेला माहीत असून खरच केंद्र सरकार मदतीच्या भूमिकेत असेल तर विरोधी पक्षनेते यांनी दिल्लीत जाऊन बसावे, असे आव्हान मंत्री सत्तार यांनी यावेळी केले.