लातूर- परराज्यात अडकलेल्या नागरिकांना आपापल्या राज्यात जाण्यासाठी शासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. लातूर जिल्ह्यातही याबाबतची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून बाहेर जाणाऱ्या व्यक्तीची तसेच बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीची माहिती संकलन करण्यास सुरुवात झाली आहे. परराज्यात जाणारे आणि परराज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना आपल्या गावी आणण्यासाठी, नेण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यामुळे लाॅकडाऊनमुळे अडकलेले हे नागरिक लवकरच आपल्या गावी पोहोचणार आहेत.
परराज्यात अडकलेल्यांना परतण्याचा मार्ग मोकळा... हेही वाचा-कोरोनाचा कहर..! जयपूरमध्ये 20 दिवसाच्या बालकाचा मृत्यू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी आणि संचारबंदी लागू झाल्याने जिल्ह्यात परराज्यातील नागरिक अडकले आहेत. जिल्ह्यातीलही काही नागरिक बाहेर अडकले आहेत. संचारबंदीमुळे सर्व कामधंदे बंद असल्याने मजूर, कामगारांच्या हाताला कामही नाही. या नागरिकांची आर्थिक कोंडीही झाली आहे. वाहतूक सेवाही बंद असल्याने जाणेही कठीण झाले आहे. असे असले तरी प्रशासन त्यांची खाण्यापिण्याची सोय करीत आहे. मात्र, गावाची ओढ लागल्याने या नागरिकांची घालमेल होत आहे.
केंद्र शासनाने परराज्यात अडकलेल्यानागरिकांना त्याच्या गावी पाठविण्यासाठी सशर्त मंजूरी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परराज्यात अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलन करुन त्यांची जाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने माहिती संकलन करण्यास सुरुवात केली आहे. संकलित झालेली माहिती घेऊन ती प्रशासनाकडून ऑनलाइन पद्धतीने भरण्यात येणार आहे. या माहितीमध्ये व्यक्तीचे नाव, किती जण जाणार, मोबाईल नंबर, कुठून कुठे जायचे ही माहिती भरुन घेतली जात आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यात अडकलेले तसेच जिल्ह्यातील परराज्यात अडकलेल्या नागरिकांना इच्छीत स्थळी पोहोचवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
लातूर जिल्ह्यातून पर जिल्ह्यात, पर राज्यात तसेच जिल्हा अंतर्गत एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात जाण्यासाठी व लातूर जिल्ह्यात येण्यासाठी अधिक माहितीसाठी नागरिकांनी 02382/222211, 220204 या क्रमांकावर संपर्क करायचा आहे. तर अर्ज भरण्यासाठी http://latur.gov.in या लिंकचा वापर करायचा आहे.