लातूर - शोले स्टाईल आंदोलन आतापर्यंत वेगवेगळ्या मागण्यासाठी झाले आहे. परंतु, औसा तालुक्यातील बोरगाव (न) येथे चक्क दारूबंदीसाठी एका तरुणाने मोबाईलच्या टॉवरवर चढून आंदोलन केले आहे. राजेंद्र आवचार असे या तरुणाचे नाव आहे. गावात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढत असल्याने अशा अनोख्या पद्धतीने केलेल्या आंदोलनाची चर्चा रंगू लागली आहे.
दारूबंदीसाठी बोरगावात तरुणाचे 'शोले' स्टाईल आंदोलन
गावागावांत दारूचे अड्डे वाढत आहेत. दारूबंदीचा ठराव ग्रामसभेत घेतला जातो. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यातूनच हा प्रकार समोर आला आहे. दारूबंदीसाठी आता गावातील तरुण एकवटले आहेत. त्यामुळे आता तरी दारूबंदीचा प्रश्न मार्गी लागेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
औसा तालुक्यातील बोरगाव (न) हे दोन हजार लोकवस्तीचे गाव असून येथे दोन ठिकाणी अवैध दारू विक्री केली जात आहे. गल्ली बोळात तळीरामांचा वावर वाढत आहे. तरुणाई व्यसनाधीन होत असून याचा त्रास गावच्या महिलांना होत आहे. अनेकांचे संसारही उद्धवस्त होत आहेत. दारूबंदीसाठी अनेक वेळा आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. मात्र, ग्रामपंचायतीसह पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच मुख्य चौकात असलेल्या मोबाईलच्या टॉवरवर चढून दारूबंदी करण्याची मागणी केल्याचे राजेंद्र यांनी सांगितले.
गावचे सरपंच आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी दारूबंदी केली जाईल, अशी हमी दिल्यानंतरच आवचार खाली उतरले. गावागावांत दारूचे अड्डे वाढत आहेत. दारूबंदीचा ठराव ग्रामसभेत घेतला जातो. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यातूनच हा प्रकार समोर आला आहे. दारूबंदीसाठी आता गावातील तरुण एकवटले आहेत. त्यामुळे आता तरी दारूबंदीचा प्रश्न मार्गी लागेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. तसेच, ग्रामसभेतील ठरावाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सरपंच अनिल सुतार यांनी सांगितले आहे.