लातूर- पावसाला सुरुवात होताच शहरात उपापयोजना करण्यापेक्षा महानगरपालिकेच्या डागडुजीमध्येच अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त होते. यामुळे पावसाळ्यात लातूरकरांच्या सुविधांचे काय ? असा सवाल उपस्थित होत आहे. गुरूवारी सायंकाळी रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि महानगरपालिकेतील प्रत्येक विभागाचे कर्मचारी खिडक्यांमधून पाऊस येऊ नये, म्हणून कसरत करीत होते.
पावसाळ्यापूर्वीची कामे शहरात सुरू असल्याचे मनपाच्यावतीने सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात स्थिती वेगळीच आहे. जागोजागी गटारी तुंबलेल्या असून मुख्य रस्त्यावर विद्युत तारा लोंबकळत आहेत. याचा प्रत्यय पावसाच्या पहिल्याच दिवशी आला. महानगरपालिकेसमोरच असलेल्या रहदारीच्या मार्गावर विद्युत तारा लोंबकाळत होत्या. तर मनपातील सर्व विभागाचे अधिकारी बॅनर घेऊन खिडकीला लटकवत असल्याचे दिसून आले.
मागील वर्षभरापासून खिडक्यांची डागडूजी करण्याची मागणी अधिकाऱ्याकडून होत आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनीधी आणि वरीष्ठांचे दुर्लक्ष होत आहे. स्वच्छता विभाग, मालमत्ता कर विभाग, सामान्य प्रशासन विभाग, आरोग्य विभाग एवढेच नाही, तर उपायुक्त यांच्या कक्षामध्येही खिडकीतून पाणी येत होते. त्यामुळे नागरिकांच्या कागदपत्रांबाबत मनपा किती जागृत आहे, याचा प्रत्यय येत होता. प्रशासनाची ही अवस्था असताना दुसरीकडे मात्र लोकप्रतिनीधींचे कक्ष सर्व सोईयुक्त आहेत.