लातूर - जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला असून या दुष्काळाच्या संकटात राज्य सरकारकडून अपूरा निधी पुरवठा करण्यात येत आहे. या गंभीर प्रश्नाकडे जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर कानाडोळा करत आहेत. यामुळे झोपेचे सोंग घेणाऱ्या पालकमंत्र्यांना जागे करण्यासाठी, मनसेच्या वतीने निलंगा उपविभागीय कार्यालयासमोर 'झोपा काढो' आंदोलन करण्यात आले. या अनोख्या आंदोलनात मनसे अधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठवाड्यात दुष्काळाच्या सर्वाधिक झळा लातूर जिल्ह्याला सहन कराव्या लागत आहे. यातच यंदाही पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य शासनाने दुष्काळ निवारण्यासाठी भरीव निधी देऊनही लातूरकरांच्या पदरी निराशाच पडली आहे. राज्य सरकारने मराठवाड्याकरिता 390 कोटी 25 लाख 34 हजार असा आयुक्तांकडे वर्ग केला. त्यामुळे पेरणी न झालेल्या आणि दुबार पेरणीच्या संकटात अडकलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे. मात्र, लातूर जिल्हा याला अपवाद राहिला आहे.