लातूर - अनलॉकच्या घोषणेनंतर सर्व उद्योग- व्यवसाय, बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहेत. हळूहळू सर्व पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, शैक्षणिक क्षेत्राला लागलेला ब्रेक अद्याप तसाच आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अजूनही शाळा, महाविद्यालये आणि खासगी क्लासेस बंद आहेत. लातूरचे अर्थचक्र हे तेथे सुरू असलेल्या 200 ते 300 खासगी क्लासेसवर फिरते. गेल्या पाच महिन्यांपासून क्लासेस बंद असल्याने केवळ विद्यार्थी आणि क्लासेस चालकांवरच नाही तर यावर अवलंबून असलेल्या अनेक लहान- मोठ्या व्यावसायिकांवरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारपेठा आणि इतर बाबी सुरू झाल्या असल्या तरी लातूरच्या अर्थचक्राला चालना देणारा घटक अद्यापही लॉकच आहे.
शैक्षणिकदृष्ट्या लातूर शहराला मोठे महत्व आहे. लातूर पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांचा ओढा लातूरकडेच राहिलेला आहे. त्यामुळे महाविद्यालयात अॅडमिशन कुठेही असो क्लाससाठी मात्र, लाखो रुपये मोजून लातूरलाच जवळ केले जाते. शहराच्या मध्यवर्ती भागात 200हून अधिक क्लासेस आणि 25 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची वर्दळ असते. महाविद्यालयांना सुट्ट्या असल्या तरी हा परिसर कायम विद्यार्थ्यांनी गजबजलेला असतो. 25 हजार विद्यार्थ्यांचे वास्तव्य असल्याने त्या अनुषंगाने इतर व्यवसायांनाही चालना मिळाली. यामध्ये वसतीगृहे, मेस, बुक सेंटर यासारख्या अनेक घटकांचा समावेश आहे. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे ही कोट्यवधींची उलाढाल थेट हजारामध्ये आली आहे.