लातूर -पावसाच्या लहरीपणाचा फटका पुन्हा एकदा मराठवाड्याला बसत आहे. लातूर विभागातील एकाही जिल्ह्यात सरासरीपेक्षा ४० टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली नाही. शिवाय पेरणी झालेल्या जमीन क्षेत्रावरील पिके पाण्याअभावी उगवतील की नाही, अशी स्थिती असल्याने विभागातील पाचही जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे.
मराठवाड्यात यंदा सुरुवातीपासूनच पावसाने पाठ फिरवलेली आहे. त्यामुळे पेरणी योग्य पाऊस झाल्यावरच चाढ्यावर मूठ धरण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता. जुलै महिना निम्म्यावर आला तरी एकाही जिल्ह्याने १०० टक्क्यापेक्षा अधिक सरासरी गाठलेली नाही. लातूर विभागात लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्वाधिक पेरा हिंगोली येथे १ लाख ४१ हजार ५१३ म्हणजे सरासरीच्या ३५ टक्के पेरा झाला आहे तर सर्वात कमी लातूर जिल्ह्यात १ लाख ५ हजार १०३ हेक्टरावर म्हणजे सरासरीच्या केवळ १६ टक्के परणी झाली आहे.