लातूर- कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाबाबत 'आज फिर जिने की तमन्ना है' या नाटिकेतून लोकांचे प्रबोधन करणाऱ्या शिक्षिकेलाच कॅन्सरचे निदान झाले. जिद्द आणि लढाई यथार्थ या दोन्ही कौशल्यावर आपला शिक्षकीपेशा सांभाळत कॅन्सरशी दोन हात करणाऱ्या कल्पना श्यामराव भट्टड यांची ही 'कल्पने'पलीकडची कथा ही फिनिक्स पक्षाच्या भरारीप्रमाणे आहे. ज्या नाटिकेतून प्रबोधन करत त्याचा वास्तवाशी मेळ घालून त्या पुन्हा प्रबोधनाचा वसा घेण्यास तयार झाल्या आहेत.
कल्पना भट्टड ह्या शिक्षकीपेशा सांभाळत बहिणाबाई वाचक मंचाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करीत आहेत. यामधीलच एक भाग म्हणून त्यांनी ' फिर जिने की एक तमन्ना' या नाटिकेतून कॅन्सर रोगाबाबत प्रबोधनाचे काम केले आहे. आतापर्यंत या नाटकाचे १० यशस्वी प्रयोग पार पडले आहेत. मात्र, नियतीने कल्पना यांच्या बाबतीत असा खेळ खेळला की ज्या नाटकाच्या माध्यमातून कॅन्सरबाबत प्रोबोधन केले जात होते, तोच आजार त्यांना झाला. त्यांना स्तनाच्या कॅन्सरचे निदान झाले. जणू काही नाटिकेत केलेला प्रयोग आता प्रत्यक्षात करून दाखव असेच नियतीला म्हणायचे होते की काय? मात्र अशा परिस्थितीमध्येही न डगमगता जिद्द आणि लढाईचे यथार्थ दाखवले आहे.