लातूर- अल्पसंख्याक विद्यार्थी गतवर्षीच्या शिष्यवृत्तीपासून अजूनही वंचित आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत अडचणी निर्माण होत असून विद्यर्थ्यांना त्वरित शिष्यवृत्ती देण्याच्या मागणीसाठी सोमवारी महाराष्ट्र जनएकता संघटनेच्यावतीने लातूर येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी जनएकता संघटनेचे धरणे आंदोलन - अल्पसंख्यांक
शिष्यवृत्ती दोन टप्प्यात न देता एकाच वेळी विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी धरणे आंदोलनावेळी करण्यात आली आहे. यासंबंधी त्वरित निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
राज्यात मुस्लिम, पारसी, ख्रिश्चन या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वर्षाकाठी २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाच्या नियमाप्रमाणे ऑनलाईन फॉर्मही भरले आहेत. मात्र, जुलै महिना उजाडला तरी गतवर्षीची शिष्यवृत्ती अद्यापही न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत.
विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ही हक्काची असून राज्य सरकारचे धोरण चुकीचे असल्याने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना संघटनेच्यावतीने व्यक्त करण्यात आली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत विद्यार्थीही आंदोलनात उपस्थित होते.