लातूर -लातूर हे मराठवड्यातील व्यापाराचे केंद्रबिंदू आहे. बाजारपेठेबरोबरच या ठिकाणी औद्योगिक वसाहतीचे जाळे निर्माण झाले आहे. यामध्ये लातूर-गुलबर्गा ही दोन महत्त्वाची स्थानक रेल्वेने जोडली जाणार आहेत. पण यापूर्वीच या मार्गावरून राजकारण तापू लागले आहे. निलंगा आणि औसा लोकप्रतिनिधीच नाही, तर सर्वसामान्य नागरिकही याबाबतीत समोर येऊ लागले आहेत.
केंद्रीय पथकाने लातूर रोड-नांदगाव-निलंगा-कासार शिराशी अशाच रेल्वे मार्ग करण्यात येणार असल्याचे निलंगा मतदार संघाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट केले आहे. तर, माजी आमदार बसवराज पाटील यांनी 2014 सालीच औसा-लामजाना-किल्लारी-उमरगा- गुलबर्गा असा मार्ग व्हावा, याकरिता प्रस्ताव केंद्र सरकारकडे सुपूर्द केला होता आणि मंजूरही झाला असल्याचा दावा औसेकर करीत आहेत. यामुळे भाजपात अंतर्गत मतभेद निर्माण होऊ लागले आहेत.
जिल्ह्यात लातूररोड जंक्शन आणि लातूर स्टेशन असे महत्वाचे केंद्र आहेत. गुलबर्गाला रेल्वे सुरू झाल्याने जिल्ह्यातील दळणवळण अधिक वाढणार आहे. तसेच दक्षिण-उत्तरेला जोडणारा हा मार्ग होणार आहे. परंतु, पथकाने पाहणी केल्यापासून या मार्गावरून राजकारण सुरू झाले आहे. ही रेल्वे औसा येथूनच मार्गस्थ होणार असल्याचा दावा आमदार अभिमन्यू पवार यांनी केला आहे. एवढेच नाही, तर याकरिता संघर्ष समितीचीही स्थापना करण्यात आली आहे. हा मार्ग मंजूर न झाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा या संघर्ष समितीने दिला आहे. तर, दुसरीकडे निलंगा येथूनच सर्व्हे झाला आहे. यापूर्वी रेल्वेमंत्री पियुष गोयल, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होऊन लातूर रोड-गुलबर्गा हा ट्रक मंजूर झाल्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट केले आहे. आद्यपही, प्रत्यक्ष रेल्वे कामाला अवधी असला, तरी राजकिय वातावरण ढवळून निघत आहे. या वादात रेल्वेचा प्रश्न प्रलंबित राहू नये हीच अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहे.