लातूर -चाकूर तालुक्यात शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा आणि दोन शेळ्यांचा विद्युत वाहिनीचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. चाकूर तालुक्यातील आंजनसोंडा येथे मंगळवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारा जमिनीवर पडल्या होत्या आणि त्यातुन विद्युत प्रवाह सुरूच असल्याने हा अपघात घडला.
हेही वाचा...कोरोनाचा विळखा : धारावीत आढळले दोन नवे रुग्ण, परिसर 'सील'
चापोली येथुन जवळ असलेल्या आजनसोंडा येथे सोमवारी रात्री वादळी वारे सुटले होते. त्यामुळे काही शिवारातील विद्युत तारा जमिनीवर पडल्या होत्या. आज सकाळी नेहमीप्रमाणे संदीप बंडू तलंगे हा मुलगा शेळ्या चारण्यासाठी शिवारात गेला होता. त्यावेळी शेळीचा पाय विद्युत तारेवर पडला यातच तिचा मृत्यू झाला. मात्र, शेळीचा पाय अडकल्याचे पाहून संदीप तिला काढण्यासाठी गेला आणि त्यालाही विद्युत वाहिनीचा शॉक लागला.
या दुर्दैवी घटनेत दोन शेळ्यांसह संदीपचा जागीच मृत्यू झाला आहे. संदीपने नुकतीच इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. घटनेची माहीती मिळताच महावितरणचे उपविभागीय अभियंता अभिजीत अडगुबे, बीट जमादार सुभाष हरणे, पोलीस कॉन्स्टेबल सुकेश केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल माधव सारोळे सह आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणी चाकूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेबाबत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या दुर्दैवी घटनेमुळे आंजनसोडा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.