नुकसान आहे, पण तात्काळ मदत देता येणार नाही- मंत्री विजय वडेट्टीवार
शेतकऱ्यांना तात्काळ मदत देता येणार नाही, असं विधान आप्पत्ती व्यवस्थापन आणि मदत पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवर यांनी केले आहे. मदतीसाठी पंचनामे, नुकसानाचा आढावा, नुकसानाचा आकडा हे सर्व घेऊन कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक घेऊन वेळप्रसंगी कर्ज काढू, असे सांगतानाच तात्काळ मदत देता येणार नाही. यासाठी प्रक्रिया पूर्ण करूनच मदत द्यावी लागणार, असंही मंत्री विजय वडेट्टीवर यांनी स्पष्ट केले.
लातूर - परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बांधावर आल्यावर नुकसानाची भयावह स्थिती लक्षात येते. पण अशी तात्काळ मदत देता येणार नाही, असं विधान आप्पत्ती व्यवस्थापन आणि मदत पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवर यांनी केले आहे. मदतीसाठी पंचनामे, नुकसानाचा आढावा, नुकसानाचा आकडा हे सर्व घेऊन कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक घेऊन वेळप्रसंगी कर्ज काढू. पण तात्काळ मदत देता येणार नाही. यासाठी प्रक्रिया पूर्ण करूनच मदत द्यावी लागणार, असंही मंत्री विजय वडेट्टीवर म्हणाले आहेत.
पीक नुकसान पाहणीसाठी मंत्री विजय वडेट्टीवार येणार म्हणून सकाळपासून शेतकरी बांधावर होते. सायंकाळी 5 वाजता मंत्री वडेट्टीवार सोनखेडमधील निलंगा या गावच्या शिवारात दाखल झाले. या शिवारातील सोयाबीन, फुटलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांची पाहणी केली. ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन वाहून गेली आहे त्या शेतकऱ्यांसाठी विशेष मदत केली जाणार आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे केले जाणार आहेत. नुकसानाची आकडेवारी आल्यानंतर सरकार मदत जाहीर करणार आहे. नुकसान तर झालेच आहे, पण मदतीसाठीची आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री हेच मदत जाहीर करतील. वेळप्रसंगी राज्यसरकार कर्ज काढेल, असे सांगून वडेट्टीवार म्हणाले, केंद्र सरकारला मदतीचे आवाहन केले आहे. त्यामुळे केंद्राचे पथकही पाहणीसाठी येईल आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत केली जाईल.