लातूर - लॉकडाऊनचा कालावधी वाढत आहे, तसे दारूबाबतच्या वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत. अवैध दारूविक्री संबंधी पोलीस ठाण्यात तक्रार केल्याप्रकरणी थेट सरपंचालाच मारहाण झाल्याची घटना लातूर तालुक्यातील वांजरखेडा येथे घडली आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या समोर हा सर्व प्रकार झाला.
धक्कादायक..! अवैध दारू विक्रीबाबत तक्रार देणाऱ्या संरपचालाच पोलिसांसमोर मारहाण
अवैध दारूविक्री संबंधी पोलीस ठाण्यात तक्रार केल्याप्रकरणी थेट सरपंचालाच मारहाण झाल्याची घटना लातूर तालुक्यातील वांजरखेडा येथे घडली आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या समोर हा सर्व प्रकार झाला.
वांजरखेडा येथे गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री केली जात आहे. याला कायम सरपंच लक्ष्मण चव्हाण यांचा विरोध राहिला आहे. सध्याच्या लॉकडाऊनमध्ये अवैध दारूविक्री सुरूच असल्याने नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी गातेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कारवाईसाठी पोलीस गावातही आले. परंतु, हा केवळ दिखावाच होता का? असा सवाल उपस्थित झाला. कारण या चार पोलिसांच्या समोरच दारू विक्रेत्याने चक्क सरपंचांना मारहाण केली. यामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. सरपंच लक्ष्मण चव्हाण यांच्यावर उपचार सुरू आहेत तर या प्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे.