लातूर - सध्या लॉकडाऊनच्या काळात अनेकजण घरात बसून आहेत. मात्र, समाजात असाही घटक आहे की, ज्यांना त्यांचे पोट घरी बसू देत नाही. म्हणूनच गंजगोलाईत आजही शेकडो मजुर येतात, पण हाताला काम मिळत नसल्याने त्यांच्या पोटालाही काही मिळत नाही. मग याच पोटासाठी दुसऱ्यासमोर हात पसरण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवत आहे. अशा व्यक्तींना कोणी 5 तर कोणी 10 रुपये देतात. त्यामुळे जर त्यांना शिवभोजन मिळाले तर ठिक, अन्यथा त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते.
लातूरात शिवभोजन मिळाल्यास मजूरांची होते उपासमार... हेही वाचा....जगभरात कोरोना विषाणूमुळे 1 लाख नागरिकांचा मृत्यू
लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि गंजगोलाई येथे कामाच्या शोधात हजारो कामगार येतात. दिवसभर काम आणि रात्री घर जवळ करून अनेकांच्या संसाराचा गाडा सुरळीत चालतो. मात्र, सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे याच मजुरांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
गावाकडून ये-जा करणे परवडत नसल्याने अनेकजण तर 10 रुपयांची भीक मागून शिवभोजनाचा आधार घेतात. नाही तर पोटात पाय घेऊन रात्र काढतात. ग्रामीण भागातल्या मजुरांना 2 किलो गहू, तांदूळ मिळाले आहेत. पण हे किती दिवस पुरणार म्हणून मजुर नित्यनियमाने या ठिकाणी हजेरी लावतात. मात्र, नागरिकच घराबाहेर पडत नसल्याने त्यांनाही काम मिळत नाही. काही वेळाने पोलीसही सदर जागेवर थांबू देत नाहीत.
हेही वाचा...ईटीव्ही भारत विशेष : शिक्षण विभागासमोर विविध विद्यापीठांच्या आणि महाविद्यालयीन परीक्षांचा मेळ घालण्याचे आव्हान
जिथे पोटालाच काही नाही तिथे कसले सोशल डिस्टन्सिंग आणि कुठली खबरदारी. त्यामुळे कोरोनाचा फटका उच्च विभूषितांपासून ते हातावर पोट असणाऱ्यांना बसत आहे. काम मिळत नसल्याने या ठिकाणी येणाऱ्या मजुरांची संख्या कमी झाली असली तरी समस्या मात्र कायम आहेत. त्यामुळे शासनाने मदत करण्याची मागणी हे मजुर करत आहेत.