लातूर - गेल्या आठ महिन्यात एक वाक्य सर्रास ऐकायला मिळते. ते म्हणजे, 'कोरोनामुळे जगणं मुश्किल झालंय'. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीचा सामना कसा करायचा, हे एड्सग्रस्त मुलांनी दाखवून दिले आहे. ही अतिशयोक्ती वाटत असली तरी वास्तव आहे. लातूर जिल्ह्यातील हासेगाव येथे 'हॅप्पी इंडियन व्हिलेज' नावाचे सेवालय आहे. कोरोनाचा परिणाम सर्वच घटकांवर झाला. तसाच तो सेवालयाला मिळणाऱ्या मदत निधीवरही झाला. गेल्या 13 वर्षाच्या कालावधीत कधी एवढी टंचाई भासली नाही, ती कोरोनाच्या काळात भासली. सेवालयाचे संस्थापक रवी बापटले यांना जाणवली. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीत रवी बापटले यांचे अभिनव उपक्रम आणि सेवालयातील 84 मुलांची त्यांना मिळालेली साथ ही अधोरेखीत करण्यासारखी आहे.
लातूर शहरापासून अवघ्या 12 किमी अंतरावर 14 एकरात एड्स बाधित मुलांच्या संगोपनासाठी 'हॅप्पी इंडियन व्हिलेज' उभारण्यात आले आहे. सेवालयाच्या स्थापनेचा काळ तसा खडतर होता. समाजातून होत असलेला विरोध, नागरिकांची तिरस्काराची भावना या सर्व गोष्टींचा सामना करीत रवी बापटले यांनी एका मुलाला घेऊन सुरू केलेल्या सेवालयात आता 84 मुलं-मुली आहेत. काळाच्या ओघात समाजाचा बघण्याचा दृष्टिकोनही बदलला आणि सेवालयाचे उद्देश समाजासमोर उभा राहिला. यातून मदतीचे हात पुढे येऊ लागले. उभारणीच्या काळातील संघर्षापेक्षा कठीण काळ होता तो कोरोनाचा. ओढावलेल्या परिस्थितीमुळे अनेकांनी आखडते हात घेतले. तर दुसरीकडे मुलांची संख्याही मोठी होती. जिथे माणूस फिरकायला तयार नाही तिथे मदत कोठून मिळणार, अशी स्थिती निर्माण झाली होती. याच परिस्थितीचे सोने सेवालयातील मुलांनी रवी बापटले यांच्या मदतीने केले.
कोरोना काळात मास्कची विक्री -
सेवालयातील मुलांच्या संगोपनासाठी दिवसाकाठीचा पाच हजार रुपयांचा खर्च आहे. अशा परिस्थितीमध्ये सेवालायतील मुलांनी पाहिले काम हाती घेतले ते मास्क बनविण्याचे. दरम्यानच्या काळात या मुलांनी 35 हजार मास्क बनविले. त्यातून त्यांच्या पदरी 1 लाख रुपये पडले.
डोंगराळ भागात फुलवली शेती -
एवढ्यावरच न थांबता या सहा महिन्यांच्या कालावधीत सेवालयच्या 14 एकर परिसरातील डोंगराळ भागात मुलांनी शेती फुलवली. यामध्ये भाजीपाला लागवड, कुकुटपालन, जनावरे एवढेच नाही तर शेततळे उभारून डाळींब बागेचीही लागवड केली आहे. त्यामुळे रोज लागणाऱ्या भाजीपाल्याचा प्रश्न मिटला. शिवाय दूधही उपलब्ध झाले. तसेच मास्कच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून इतर गरजा पुरवल्या गेल्या. सेवालायतील 84 मुलांचे वेगवेगळे ग्रुप तयार करण्यात आले होते. आपलाच ग्रुप कामात सरस कसा हे दाखवून देण्यासाठी प्रत्येकजण कष्ट करीत होता. आजही सेवालयच्या प्रवेशद्वारापासून ते किचनपर्यंत मुलांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी शिस्त तर आहेच. परंतु प्रत्यक्षात काम करायचे कसे याचा अनुभव प्रत्येक मुलाला मिळाला आहे.
चार एकरात फुलली बाग -