लातूर - गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या मंदावली होती. सोमवारी मात्र, 63 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शिवाय एकाच वसतिगृहातील 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने पुन्हा एकदा कोरोनाचे सावट वाढू लागले आहे.
सद्यस्थितीत 343 सक्रिय रुग्ण -
डिसेंबर 2020 पासून लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस घटत होती. त्यामुळे केवळ एकच कोविड सेंटर सुरू ठेवण्यात आले होते. 23 नोव्हेंबरपासून शाळा, महाविद्यालय हे देखील सुरू झाले आहेत. सर्व काही पूर्वपदावर येत असताना सोमवारी 63 रुग्णांची भर पडल्याने लातूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे. शहरातील एमआयडीसी परिसरातील एका वसतिगृहातील एका मुलीला कोरोनाची लागण झाली होती. मुलीच्या संपर्कात आलेल्या इतर 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 343 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत 703 जणांना जीव गमवावा लागला आहे. सोमवारी वाढलेली रुग्ण संख्या ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे शहरातील क्लासेस, शाळा यासंदर्भात जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.
हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात रात्री संचारबंदी; शाळा-महाविद्यालयांत होणार तपासणी