लातूर- अपुऱ्या पावसाच्या जोरावर जिल्ह्यात काही ठिकाणी खरीपाच्या पेरणीला सुरवात झाली आहे. मात्र, पावसाच्या लहरीपणाचा फटका काही शेतकऱ्यांना बसत आहे. अशावेळी पावसाच्या लहरीपणात शेतकऱ्यांची पिके जोपासली जातील की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. उशिरा का होईना जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असले तरी हा पाऊस पेरणीसाठी अपूरा असून कृषी विभागाच्या वतीने सबुरीचा सल्ला दिला जात आहे.
पेरणीचा 'श्रीगणेशा'..! मात्र बळीराजावरील चिंतेचे ढग कायम
अपुऱ्या पावसाच्या जोरावर जिल्ह्यात काही ठिकाणी खरीपाच्या पेरणीला सुरवात झाली आहे. मात्र, पावसाच्या लहरीपणाचा फटका काही शेतकऱ्यांना बसत आहे. अश्यावेळी पावसाच्या लहरीपणात शेतकऱ्यांची पिके जोपासली जातील की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे.
या आठवड्याच्या सुरवातीपासून जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली आहे. मात्र, अनिश्चित व अनियमित पावसाचा परिणाम यंदाही खरीपाच्या पेरणीवर दिसून येत आहे. मंडळानिहाय पावसामध्ये तफावत असून उदगीर, अहमदपूर, चाकूर आणि लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी काही प्रमाणात का होईना पेरणीला सुरवात केली आहे. मात्र, पावसामध्ये सातत्य राहिले तर पिके जोपासली जातील अन्यथा दुबार पेरणीचा दुहेरी फटका सहन करावा लागणार असल्याची भिती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
लातूर तालुक्यातील नांदगाव शिवारातील काही भागात पेरणीला सुरवात झाली आहे. तर काही ठिकाणी अजूनही मशागतीचेच कामे केली जात आहे. मान्सुन राज्यात सक्रीय झाल्याचे चित्र हिवामान विभागाकडून नर्माण केले जात असले, तरी ग्राऊंड स्थरावर वेगळीच स्थिती आहे. एकीकडे शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेशी ओल नसल्याने पावसाची प्रतीक्षा करण्यावर भर दिला आहे. तर दुसरीकडे वरुणराजाच्या भरवाशावर एकरी ५ हजार रुपये खर्च करून बियाणे जमिनीत गाडले जात आहे. जिल्ह्यात पावसाची सरासरी ८०२ मिमी असून अद्यापपर्यंत केवळ ६९ मिमी पाऊस झाला आहे. ही जिल्ह्याची सरासरी असली तरी मंडळानिहाय मोठी तफावत आहे. खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र ६ लाख ३ हजार हेक्टर असून त्यापैकी केवळ ५ टक्यांवरच पेरण्या झाल्याची नोंद जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयात आहे. जून अखेरपर्यंत ना पावसाचा टक्का वाढला ना परेणीचा त्यामुळे अपुऱ्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणीचे धाडस केले असले तरी त्यावर चिंतेचे ढग कायम आहेत.