लातूर- उपविभागीय अधिकारी यांचे पती माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत, असे सांगून राष्ट्रीय महामार्गात संपादित झालेल्या जमिनीची रखडलेली रक्कम मिळवून देतो, असे म्हणत १ लाखाच्या लाचेची मागणी करणाऱ्या ज्योतिबा ज्ञानोबा फुलारी (वय 26) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. मात्र, ज्यांची ओळख देऊन लाच घेण्याऱ्याने लाच मागितली, तो माझा पती नसून आत्तापर्यंत आपण अविवाहित असल्याचे उपविभागीय अधिकारी शुभांगी आंधळे यांनी सांगितले. आंधळे यांच्या या वक्तव्याने विभागात खळबळ उडाली आहे.
'तो' माझा पती नव्हेच; उपविभागीय अधिकारी शुभांगी आंधळे यांच्या विधानाने खळबळ - शेतकऱ्याची इमारत राष्ट्रीय महामार्गात संपादित
उपविभागीय अधिकारी यांचे पती माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत, असे सांगून राष्ट्रीय महामार्गात संपादित झालेल्या जमिनीची रखडलेली रक्कम मिळवून देतो, असे म्हणत १ लाखाच्या लाचेची मागणी करणाऱ्या ज्योतिबा ज्ञानोबा फुलारी (वय 26) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. मात्र, ज्यांची ओळख देऊन लाच घेण्याऱ्याने लाच मागितली, तो माझा पती नसून आत्तापर्यंत आपण अविवाहित असल्याचे उपविभागीय अधिकारी शुभांगी आंधळे यांनी सांगितले.
चाकूर तालुक्यातील आष्टमोड येथील एका शेतकऱ्याची इमारत राष्ट्रीय महामार्गात संपादित झाली आहे. त्यामुळे मावेजापोटी त्यास ५६ लाख ९७ हजार ६७७ रुपये मंजूरही झाले आहेत. मात्र, ही रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी या शेतकऱ्यास अहमदपूर येथील ज्योतिबा ज्ञानोबा फुलारी याने शाळा भरवली. उपविभागीय अधिकारी आंधळे यांचे पती डॉ. विशाल फुलारी हे माझ्या ओळखीचे असल्याचे त्याने शेतकऱयास सांगितले. ओळखीच्या जोरावर मावेजाच्या रूपाने मंजूर झालेली रक्कम तुमच्या खात्यावर जमा करण्यास सांगतो, याकरिता केवळ २ टक्क्याप्रमाणे १ लाख १२ हजाराची लाच द्यावी लागेल, असे ज्योतिबा ज्ञानोबा फुलारी यांनी शेतकऱयाला सांगितले. त्यानुसार १ लाख रुपये देण्याचे ठरले होते. ठरलेल्या रकमेपैकी ५० हजार रुपयांची लाच घेत असताना ज्योतिबा फुलारी याला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रंगेहाथ पकडण्यात आले. तर डॉ. विशाल फुलारी हे फरार झाले आहेत.
मात्र, दुसरीकडे उपविभागीय अधिकारी शुभांगी आंधळे यांनी डॉ. विशाल फुलारी नावाचा व्यक्ती त्यांचा पती नाही. एवढेच नाही तर मी अविवाहित असल्याचे शुभांगी आंधळे यांनी सांगितले आहे. त्यांच्या या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे ज्ञानोबा फुलारी यानेच हा सर्व बनाव केला कि, काय अशी शंका उपस्थित होत आहे. यासंबंधी लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक माणिक बेंद्रे यांनी प्रकरण किचकट असल्याने आताच प्रतिक्रिया देणे योग्य नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे लाचेच्या रकमेपेक्षा आता उपविभागीय अधिकारी शुभांगी आंधळे यांनी केलेल्या 'तो माझा पती नव्हेच' या विधानाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.