लातूर -जिल्ह्यात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का घसरला असून या घटत्या मताचा फटका नेमका कोणाला बसतो हे याबाबत उत्सूकता वाढत चालली आहे. निवडणुकांबाबत प्रत्येक मतदारसंघात मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली होती. यात, जिल्ह्यात एकूण ६० टक्के मतदान झाले असून शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील नागरिकांनी आपला हक्क बजावला आहे.
पावसाच्या सावटाखाली जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकांची मतदान प्रक्रिया पार पडली. सोमवारी सकाळपासूनच सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सुरुवातीच्या २ तासांमध्ये केवळ ३ टक्के मतदान पार पडले. मात्र, दुपारनंतर पावसाने उघडीप दिली आणि मतदानाचा टक्का वाढण्यास सुरुवात झाली. भरपावसातही ग्रामीण भागातील नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान केले. तसेच २ दिवसाचा पाऊस आणि खरिपाची काढणी झाल्यामुळे शेतीकामेही उरकल्याने मतदान करण्यावर ग्रामस्थांनी भर दिला. असे असतानाही शहरातील नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याने २०१४ च्या तुलनेत यावेळी मतदानात ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम कोणावर होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.