लातूर- रेणा मध्यम प्रकल्पातील पाणी हे रेणापूरसह परिसरातील 52 गावांना पिण्यासाठीच राखीव ठेवावे, शेतीसाठी पाणी सोडू नये या मागणीसाठी नागरिकांनी थेट प्रकल्पाच्या पात्रातच ठिय्या दिला होता. अखेर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी हे पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आंदोलकांच्या मागणीला यश आले असून प्रकल्प क्षेत्रातील काही शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
रेणापूर तालुक्यातील भांडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पात केवळ 28 टक्के पाणी शिल्लक आहे. मात्र, शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय पाठबंधारे विभागाने घेतला होता. मात्र, रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात आहे . शेत शिवारात उसाशिवाय दुसरे पीक नाही. त्यामुळे शिल्लक पाणी उसासाठी सोडल्यास भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेणापूरसह परिसरातील नागरिकांनी प्रकल्पातील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेण्याची मागणी केली होती. अखेर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आंदोलकांची भूमिका समजून हे पाणी पिण्यासाठीच आरक्षित राहणार असल्याचे सांगितले आहे.