लातुर- जिल्ह्याच्या राजकारणात विलासराव देशमुखांचा दबदबा होता. त्यांच्या कार्यकाळात लातुर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. आता त्यांचे पुत्र अमित आणि धीरज यांच्यावर ती धुरा आहे. जिल्ह्यातील काँग्रसचा प्रभाव कमी करण्यात भाजपच्या निलंगेकर पाटलांना यश आले आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचे समसमान म्हणजेच प्रत्येकी 3 आमदार निवडून आले होते.
विलासरावांच्या नावाचं वलय आणि जनसामान्यांच्या मनात असणारा देशमुख घराण्यावरील विश्वास आणि प्रेमाच्या बळावर जिल्ह्यातील काँग्रेस मोदी लाटेनंतरही तग धरून असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पण काँग्रेसच्या गडाला सुरूंग लावण्यात भाजपला आणि मुख्यत: संभाजी पाटील निलंगेकरांना यश आले, हेही तितकेच खरे. त्यामुळे जिल्ह्याचे राजकारण फक्त भाजप विरूध्द काँग्रेस एवढेच मर्यादीत नसून निलंगेकर विरूध्द देशमुख अशी लढत असणार आहे.
हेही वाचा -२० तास काम करणार, पण राज्य चुकीच्या हातांत जाऊ देणार नाही - पवार
लातूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. भाजपला यात स्पष्ट बहुमत मिळाले होता. काँग्रेसला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले तर राष्ट्रवादी काँग्रेसची पिछेहाट झाली होती. लातूर हा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला होता. लातूर नगरपालिकेच्या स्थापनेपासून काँग्रेसचे वर्चस्व होते. लातूर म्हटल्यावर विलासराव देशमुख असे समीकरण झाले होते. सर्वाधिक काळ राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या विलासराव देशमुखांना लातूरकरांनी नेहमीच साथ दिली होती. विलासरावांच्या निधनानंतर लातूरचे नेतृत्व त्यांचे पुत्र अमित देशमुख यांच्याकडे आले. लागोपाठ दोन विधानसभा निवडणुकांमध्ये अमित देशमुख विजयी झाले. पण राज्यात भाजपची सत्ता येताच लातूरमधील राजकीय परिस्थीती बदलली. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना लक्ष करत एक एक काँग्रेसकडून हिरावून घेतले. त्यामुळे यंदाची निवडणूक संभाजी पाटील निलंगेकर आणि अमित देशमुख या दोघांसाठीही प्रतिष्ठेची बनली आहे. लातूर लोकसभेची निवडणूकही पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि आमदार अमित देशमुख यांनी प्रतिष्ठेची केली होती. अमित देशमुख यांनी गतवैभव मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. तर, वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पालकमंत्र्यांनी लक्ष केंद्रीत केले होते. जिल्ह्यातील निलंगा, अहमदपूर, उदगीर आणि लातूर शहर या चारही विधानसभा मतदारसंघात भाजपने मताधिक्य घेतले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सहाही मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकवणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.