महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेशन दुकानाच्या परवान्यासाठी 50 हजारांची लाच स्वीकारताना नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात - एसीबीकडून नायब तहसीलदाराला अटक

रेशन दुकानाचा परवाना पुन्हा मिळवून देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच स्विकारताना अहमदपूरच्या नायब तहसीलदाराला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. सुनील कांबळे असे नायब तहसीलदाराचे नाव आहे.

Anti corruption bureau latur
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर

By

Published : Aug 6, 2020, 3:38 PM IST

लातूर- स्वस्त धान्य दुकानाचा परवाना परत मिळवून देण्यासाठी 50 हजारांची लाच स्वीकारताना अहमदपूर येथील नायब तहसीलदार सुनील जयराम कांबळे (49) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. अहमदपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सध्या कोरोनामुळे ओढावलेल्या परिस्थितीमुळे रेशन दुकानातून धान्य वाटप सुरू आहे. अहमदपूर तालुक्यातील एका दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आला होता. मात्र, सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिधापत्रिका धारकांची गौरसोय होऊ नये म्हणून त्यांना दुसऱ्या दोन दुकानाशी संलग्न करण्यात आले होते. या दुकानदाराकडील धान्यही वर्ग करण्यात आले होते. रेशन दुकानाचा परवाना नव्याने मिळवून देतो म्हणत पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार सुनील जयराम कांबळे (49) यांनी तब्बल 50 हजारांची लाच मागितली होती.

संबंधित दुकानदाराने यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. तक्रारीची शहानिशा करत अहमदपूर येथील तहसील कार्यालय परिसरात सुनील कांबळे यांना 50 हजारांची लाच घेताना ए. सी.बी. च्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. सुनील कांबळे यांना अहमदपूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. एकीकडे कोरोनाने उद्भवलेल्या परिस्थितीशी प्रशासकीय यंत्रणा दोन हात करीत आहे, तर काही अधिकारी यामध्ये फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक माणिक बेद्रे, पोलीस निरीक्षक कुमार, बाबासाहेब काकडे यांनी ही कारवाई केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details