लातूर- रेणापूर येथून लातूरकडे परतत असताना नवीन रेणापूर नाका येथे रविवारी टिप्परच्या धडकेत शिक्षक श्रीपाद दिंडोरे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. परंपरेला फाटा देत त्यांच्या पार्थिवावर मुलीनेच अंत्यसंस्कार करून समाजासमोर एक आदर्श घडवून आणला आहे.
...म्हणून मुलीनेच केले वडिलांवर अंत्यसंस्कार - accident
रेणापूर येथून लातूरकडे परतत असताना नवीन रेणापूर नाका येथे रविवारी टिप्परच्या धडकेत शिक्षक श्रीपाद दिंडोरे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिवावर काल (सोमवार) अंत्यसंस्कार करण्यात आले.
दिंडोरे दाम्पत्याला दोन्हीही मुलीच आहेत. मात्र, पुरोगामी समाजाला साजेल असेच काम आतापर्यंत त्यांनी केले आहे. मोठी मुलगी सायली हिचा त्यांनी अंतरजातीय विवाह मोठ्या दिमाखात पार पडला होता. मुलगी आजारी असल्याने वडील श्रीपाद यांनी स्वतःची किडनी मुलीला दिली होती. मात्र, दुर्दैवाने २० दिवसांपूर्वीच तिचा आजारामध्ये मृत्यू झाला होता.
रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातामध्ये श्रीपाद दिंडोरे यांना जीव गमवावा लागला. सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगी शिवानी हिने मुलाची भूमिका निभावत अंत्यसंस्कार केले. मुलगा नसल्यास मृताच्या भावाकडून हा विधी पार पाडले जातात. मात्र, या सर्व परंपरांना फाटा देत शिवानी हिने वडिलांवर अंत्यसंस्कार करून एक आदर्श घडवून आणला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.