लातूर -जिल्ह्यात गेल्या ८ दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काढणी झालेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता जगावे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
लातुरात सोयाबीन चिखलात अन् शेतकरी संकटात लातूरमध्ये सोयाबीन हेच खरिपातील प्रमुख पीक आहे. हंगामाच्या सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने संपूर्ण हंगामचे धोक्यात होता. शेतकऱ्यांनी अल्पशा पावसावर पिकांची जोपासना केली. मात्र, ऐन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेली पीके शेतातच पडलेले आहे. काही गुडघाभर पाणी आहे. त्यामुळे खरिपाचा हंगाम हातातून गेलेला आहे.
गातेगाव येथील सुरेखा राजाभाऊ डोने यांनी ४ बॅगच्या सोयाबीनची पेरणी केली होती. त्यांनी तळ हाताप्रमाणे त्या पिकांची जोपासना केली. मात्र, निसर्गाची अवकृपा झाली आणि संपूर्ण पीक पाण्याखाली गेल्याचे सुरेखा यांनी सांगितले.
नुकसानीचे पंचनामे तसेच कुठलीही औपचारिकता न करत सरसकट प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. पावसाने लवकर उघडीप न दिल्यास खरिपापाठोपाठ रब्बीवर हंगामासाठी देखील धोक्याची घंटा मानली जात आहे. परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने रब्बीला उशिराने सुरुवात होणार आहे. सध्याची अवस्था पाहता शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे आहे.