लातूर- जंगम समाजात अंत्यसंस्कार हे दफनविधी करून केले जातात. मात्र कोरोनामुळे अंत्यविधीला माणसं येत नाहीत, तर मग दफन करण्यासाठी खड्डा तरी खोदणार कोण? ही परिस्थिती लातूरमधील स्वामी कुटुंबीयांवर ओढवली. तेव्हा त्यांनी परंपरेला फाटा देत दफन ऐवजी दहन करत अंत्यसंस्कार केले.
लातूरातील बार्शी रोडवर महेश स्वामी (४४) व त्यांच्या पत्नी या चहाचे हॉटेल चालवत आपला उदरनिर्वाह करीत होते. हॉटेल व्यवसायातून नवरा-बायको आणि एक मुलगा असा त्यांचा संसार सुरू होता. मात्र, काळाचा घाला झाला आणि कर्त्या पुरूषाचेच निधन झाले. चार दिवसांपासून महेश स्वामी हे शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच बिकट झाल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले. घरात १४ वर्षाचा मुलगा आणि त्याची आईच. सध्या कोरोनामुळे सर्व वाहतूक व्यवस्था बंद आहे. शासकीय वाहनातूनच महेश यांना घरी आणण्यात आले. त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि गुरूवारी दुपारी त्यांचे निधन झाले.
कोरोनामुळे शासनाने अंत्यविधीसाठीही २५ नागरिकांची मर्यादा ठरवून दिली आहे. मात्र, स्वामींच्या निधनप्रसंगी केवळ दोन व्यक्ती त्या म्हणजे मुलगा आणि पत्नी जयश्रीताई.. अशा स्थितीमध्ये दु: ख व्यक्त करण्यापेक्षा त्यांच्या जयश्रीताई यांना चिंता होती ती अंत्यविधी कसा करावा याची. घरातला मृतदेह स्मशानभूमीपर्यंत कसा पोहचवावा या विवंचनेत त्या होत्या. याप्रसंगी त्यांनी हरंगूळ येथील व्यंकटराव पनाळे यांच्याशी संपर्क केला आणि सर्व घटनेची माहिती दिली.