लातूर - औसा तालुक्यातील टेंभी येथील 'भेल' हा ऊर्जा प्रकल्प बंद करून या ठिकाणी रामदेवबाबांचा पतंजली तेल उद्योग उभारण्याचा घाट घातला जात आहे. या प्रकल्पामुळे तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार नाही तर बेरोजगारांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्यामुळे केवळ राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेऊन केल्या जाणाऱ्या या प्रकल्पास स्थानिकांकडून विरोध होत आहे. शिवाय पतंजलीच्या प्रकल्पास एक इंचही जागा देणार नसल्याचा निर्धार काँग्रेसच्या विद्या पाटील यांनी व्यक्त केला. रामदेवबाबांच्या पतंजली तेल उद्योगाबाबत त्यांनी पत्रकारपरिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
औसा तालुक्यातील टेंभी येथे स्व. विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून महाजनकोच्या 'भेल' या ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली होती. 180 हेक्टरवरील या क्षेत्रावर असलेल्या ऊर्जा प्रकल्पामुळे 10 हजार बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार होते. या ऊर्जा प्रकल्पामुळे लातूर जिल्हा भारनियमनमुक्त होणार होता. मात्र, या प्रकल्पाला ऊर्जा न देता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रामदेवबाबा यांच्या पतंजली तेल उद्योगाला पाठबळ देत आहेत. योगदिनी नांदेड येथे फडणवीस आणि रामदेवबाबा यांनी योग केला. यामुळे त्यांच्यात अधिक जवळीकता निर्माण झाली असून तेव्हापासून या उद्योगाला पाठबळ मिळत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा विद्या पाटील यांनी केला आहे.