लातूर- जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण संख्या ही लातुर मनपा हद्दीत झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्ये वाढ होत असल्याने ऐनवेळी गैरसोय होऊ नये म्हणून आता मनपाच्या 10 सिटी बस आता रुग्णवाहिका म्हणून रस्त्यावर धावत आहेत. शिवाय सध्या जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने या बसेस एकाच ठिकाणी पार्किंगला होत्या. रुग्णवाहिकेची कमतरता भासू नये म्हणून सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांना रुग्णालयात आणण्यासाठी उपयोग होणार आहे.
लातूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 400 हून अधिक आहे. शिवाय उदगीर येथील सामान्य रुग्णालय वगळता जिल्ह्यातील रुग्ण हे लातूर येथेच दाखल होत आहेत. शासकीय रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयातही उपचार सुरू झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडे असलेल्या रुग्णवाहिका या कमी पडत होत्या. यावर पर्याय म्हणून महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी मनपाकडे असलेल्या 10 बसेसचे रूपांतर आता रुग्णवाहिकेत केले आहे. यामध्ये सर्वसोई नसल्या तरी कोरोनाची प्राथमिक लक्षणे असणाऱ्या रुग्णांना या वाहिकेतून मार्गस्थ केले जाणार आहे.