लातूर - जीर्ण झालेल्या विद्युत तारा तुटल्याने शेतामध्ये चारा खात असलेल्या चार जनावरांसह एका सालगड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. चाकूर तालुक्यातील शिवनी मजरा शिवारात ही घटना घडली. विद्युत तारा जीर्ण झाल्या होत्या, याची तक्रारही महावितरणकडे केली होती. त्यामुळे आता महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे हे जीव दगावले असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
हेही वाचा...''काबा आणि मदिना मशिदी बंद आहेत, तर मग भारतातील का नाहीत ?'' - जावेद अख्तर
शिवनी मजरा येथील मधुकर चामे यांच्या शेतामध्ये सालगडी म्हणून उत्तम विठ्ठलराव आलापूरे हे काम करत होते. तसेच त्यांच्या तिथेच चार जनावरे चारा खात होती. मंगळवारी दुपारी अचानक वारा जोराचा सुटला आणि यामध्ये विद्युत खांबावरील जीर्ण झालेल्या तारा तुटल्या. या तारा अंगावर पडल्याने एक गाय, तीन म्हशी आणि सालगडी उत्तम आलापूरे यांना जागीच जीव गमवावा लागला आहे.
घटनास्थळी धाव घेत चाकूर पोलीसांनी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जाणवळ येथील आरोग्य केंद्रात पाठवला होता. उत्तम आलापूरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. वेळीत महावितरणने येथील दुरूस्तीचे काम केले असते, तर ही दुर्घटना झाली नसती असे ग्रामस्थांचे म्हणने आहे.