लातूर- दुष्काळाचा सर्वाधिक परिणाम पशुधनावर होताना दिसत आहे. खरीप हंगाम तोंडावर असतानाही तालुक्यातील मुरुडच्या बाजारात जनावरांची आवक वाढतच आहे. त्यामुळे जनावरांच्या किमती निम्म्याने घटल्या असतानाही चारा आणि पाण्याअभावी मिळेल ते पैसे घेऊन दावणीचे जनावर व्यापाऱ्याच्या पदरी घालण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे. पोटच्या गोळ्याप्रमाणे जनावराचा सांभाळ करूनही दुष्काळाचे नैसर्गिक संकट आणि प्रशासनाची निगरगट्ट भूमिका यामुळे शेतकऱ्यांकडे पर्यायच उरला नसल्याचे चित्र मंगळवारच्या आठवडी बाजारात पाहायला मिळाले.
मुरुड येथील जनावरांच्या आठवडी बाजारात जिल्ह्यासह मराठवाड्यातून पशुधन खरेदी-विर्क्रीसाठी येत असतात. दुष्काळाची दाहकता वाढल्यापासून जनावरांची संख्याही वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत दर कमी झाले असून शेतकऱ्यांना ८० हजाराची बैलाची जोड केवळ ४० हजारात द्यावी लागत आहे. तीव्र पाणीटंचाई आणि कोणत्याच प्रकारचा चारा नसल्याने हाच अखेरचा पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. शिवाय बाजारातून आल्या पावली परत जाणेही न परवडण्यासारखे असल्याने मिळेल त्या दरात विक्री केली जात आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असतानाही मशागत कशाच्या जीवावर करायची याची परवा न करता आजचे संकट उद्याचे मरण होऊ नये म्हणून शेतकरी आपली दावण रिकामी करण्याच्या मागे आहे.