लातूर- आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांनीही आरोग्य सेवा सुरूच ठेवावी अन्यथा त्यांना नोटिसा देण्याचे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील डॉक्टर्सना पीपीई किट, मास्क हे त्यांच्या मागणीप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी उपलब्ध करून द्यावेत. जी खासगी रुग्णालये आरोग्य सेवा चालू ठेवणार नाहीत त्यांना कायदेशीर नोटीस देऊन त्यांच्यावर कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लॉकडाऊनमधील शिथिलता याबाबत बैठक पार पडली.
उदगीर शहरात तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. त्या अनुषंगाने प्रशासनाने उदगीर शहरात व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी कोरोना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.असे अमित देशमुख म्हणाले. या बैठकीस राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, महापौर विक्रांत गोजमगुंडे, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याबरोबर जिल्ह्याची आर्थिक स्थिती सुधारण्याबाबतही चर्चा झाली.