लातूर - जिल्ह्यात 408 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. सोमवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी तब्बल 2 हजार 239 इच्छुकांनी माघार घेतली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात 7 हजार 500 उमेदवार राहिले आहे. बिनविरोध ग्रामपंचायत काढण्याचे आवाहन लोकप्रतिनिधी यांनी केले होते, पण याला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र आहे.
स्थानिक पातळीवरील अंतर्गत मतभेद
जिल्ह्यात 3 लाख 56 हजार 525 पुरुष तर 3 लाख 15 हजार 543 महिला या 15 जानेवारी रोजी मतदानाचा हक्क बाजवणार आहेत. जिल्ह्यातील 408 ग्रामपंचायतीकरिता 9 हजार 938 अर्ज दाखल झाले होते. यामध्ये 20हुन अधिक ग्रामपंचायती या बिनविरोध निघाल्या आहेत. तर 2 हजार 239 इच्छुकांनी माघार घेतली आहे. लातूर तालुक्यातून सर्वाधिक म्हणजे 424 जणांनी माघार घेतली आहे. यंदा कोरोनाचे सावट आणि ग्रामपंचायत निवडणुकीवर होणारा खर्च लक्षात घेता औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी बिनविरोध ग्रामपंचायतीच्या विकास कामासाठी 21 लाख रुपये देणार असल्याचे स्पष्ट केले होते. पण तालुक्यातील एकही ग्रामपंचायत ही बिनविरोध निघालेली नाही. स्थानिक पातळीवरील अंतर्गत मतभेद यामुळे लोकप्रतिनिधींच्या आवाहनाला ग्रामस्थांनी प्रतिसाद दिलेला नाही. जिल्ह्यातील केवळ 20 ग्रामपंचायती या बिनविरोध निघाल्या आहेत, त्या गावाच्या एकोप्यामुळे
औराद शहाजनीच्या ग्रामपंचायतीकडे जिल्ह्याचे लक्ष
औराद शहाजनी ही जिल्ह्यातील एक मोठी ग्रामपंचायत मानली जात आहे. 17 जागांसाठी 5 पॅनल हे आमने-सामने आहेत. यामध्ये 78 उमेदवार हे नशीब आजमावत असून पॅनलचे 68 तर अपक्ष 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 11 हजार 230 मतदार असलेल्या या ग्रामपंचायतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.