कोल्हापूर - शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील तरुणाचा तलावात बुडून मृत्यू ( young man drowned in Lake kolhapur ) झाल्याची घटना घडली आहे. कोल्हापूरातल्या भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्ल्यावर ही घटना ( young man drowned Lake rangana fort ) घडली. ओंकार भीमराव पाटील (वय 19) असे या तरुणाचे नाव असून या घटनेची नोंद भुदरगड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
30 ते 40 तरुण गेले होते रांगणा किल्ल्यावर -
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील पनुब्रे, वारूण या गावातील 30 ते 40 तरुण 19 फेब्रुवारी रोजी साजरी होणाऱ्या शिवजयंती निमित्त शिवज्योत आणण्यासाठी गुरुवारी रांगणा किल्ल्यावर गेले होते. दिवसभर गडावरील स्वच्छता करून पुन्हा परत यायचे असे नियोजन होते. सर्वांनी स्वच्छता केली. त्यानंतर यातीलच 19 वर्षीय ओंकार हा येथील तलावाची स्वच्छता करून त्यामध्ये पोहण्यासाठी उतरला. मात्र अचनाक यामध्ये तो बुडाला. सोबत आलेल्या मित्रांनी शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये तो सापडला नाही. शेवटी याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन पथकाला याबाबत कळविण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून शोध सुरू होती. शुक्रवारी सकाळी ओंकारचा मृतदेह सापडला. दरम्यान, या संपूर्ण घटनेची भुदरगड पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापन पथकाने गडावर आक्सा लाईट आणि बोट नेली -
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गुरुवारी तात्काळ आपत्ती व्यवस्थापनची टीम गडाकडे निघाली. सोबत आक्सा लाईट, रबर बोट तसेच स्कुबा डायव्हिंगचे सर्व साहित्य घेऊन आले होते. हे सर्व गडावर घेऊन जायला बराच वेळ गेला. गडावर गेल्यानंतर बराच शोध घेतला मात्र मृतदेह सापडला नाही. शेवटी शुक्रवारी सकाळपासून पुन्हा शोधाशोध सुरू केला त्यानंतर मृतदेह तलावाच्या मधोमध सापडला.