कोल्हापूर: त्र्यंबोली यात्रा म्हणजे गल्लीची जत्रा म्हणून ओळख असणाऱ्या यात्रेचा आज शेवटचा दिवस. आषाढातील मंगळवार आणि शुक्रवारी यात्रेत भाविकांची गर्दी होत असते. शहरात सर्वच पेठांमध्ये यात्रेची धूम दिसून येत आहे. पंचगंगा नदीचे नवे पाणी त्र्यंबोली देवीला वाहले जाते. आज यात्रेचा शेवटचा दिवस असल्याने, शहरातील बहुतांश मंडळांकडून याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. पी ढबाक, हलगी गुणक्यासह साऊंड सिस्टीमसुद्धा मोठ्या प्रमाणात यात्रेत सहभागी झाले.
गेल्या अनेक वर्षांपासून परंपरा : कोल्हापुरात पंचगंगा नदीला आलेल्या नव्या पाण्याची पूजा करण्याची अनोखी परंपरा मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. आज शहरातील नागरीक आणि पेठातील तालीम मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वाजत-गाजत नव्या पाण्याचे स्वागत केले. कोल्हापुरात आजच्या दिवशी त्र्यंबोली देवीची यात्रा भरते. या दिवशी पंचगंगा नदीला आलेल्या नव्या पाण्याची पूजा करून, त्यानंतर हे पाणी देवीला आणि घरातील देवांना वाहिले जाते. मागील अनेक वर्षांपासून कोल्हापूरकरांची ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे. तर आज सकाळपासूनच शहरातील नागरिक आणि पेठांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने पंचगंगा नदीतील या नव्या पाण्याची पूजा केली.