कोल्हापूर - कोल्हापुरात आलेल्या महापुरातून नागरिकांना वाचवण्यासाठी सर्वांची धावपळ उडाली. मात्र, महापुरात अडकलेल्या सापांना आणि मुक्या जनावरांना वाचवण्यासाठी देवेंद्र भोसले आणि त्यांच्या टीमने चांगलीच धावपळ केली. यामध्ये या टीमने आत्तापर्यंत दोनशे सापांना महापुराच्या विळख्यातून वाचवले आहे. तर, महापूर ओसरल्यानंतरही घरात शिरलेल्या सापांना पकडून जीवदान देण्याचे काम या टीमने केले आहे. त्याबाबचा ईटीव्ही भारतने आढावा घेतला आहे.
2019 साली आलेल्या महापूरापेक्षा जास्त महापूर
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कोल्हापुरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जवळपास दोन दिवसांत 32 मिली मिटर पाऊस कोल्हापुरात पडला. इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापुरात 2019 साली आलेल्या महापूरापेक्षा जास्त महापूर आला. यंदाच्या वर्षाला विक्रमी अशा महापुराची नोंद आजपर्यंतच्या कोल्हापुरच्या इतिहासात झाली नव्हती. या महापुराचे पाणी नागरी वस्तीत घुसल्याने लोकांचे स्थलांतर करण्याची वेळ आली. यंदाच्या महापुरात एकही व्यक्ती पुराच्या पाण्यात दगावला नाही. योग्यवेळी नागरिकांचे स्थलांतर झाल्याने हा धोका टळला. मात्र, याचे महापुरात सापांना तत्सम प्राण्यांना आणि पशुपक्षांना वाचवण्याचे काम एका टीमने केले आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी इंडिया या संस्थेच्यावतीने महापुरात अडकलेल्या आणि महापूर ओसरल्यानंतर घरांचा आसरा घेतलेल्या सापांना जीवदान देण्याचे काम केले आहे.