कोल्हापूर -जिल्ह्यात पावसाचा जोर किंचित कमी झाला आहे. मात्र, धरणक्षेत्रात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी 25 फुटांवर पोहोचली असून जिल्ह्यात अजूनही 26 बंधारे पाण्याखाली आहेत. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात (71.50 मिमी) झाला आहे.
गतवर्षी महापुराचा सर्वाधिक फटका प्रयाग-चिखली या गावाला बसला होता. येथे चार नद्यांचा संगम होतो. त्या ठिकाणाहून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...
कोल्हापुरात पावसाचा जोर किंचित ओसरला जिल्ह्यात आजपर्यंत 978.50 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणात 66.43 दसलक्ष घन मीटर इतका पाणीसाठा झाला आहे. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता आत्तापासूनच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या धरणातून 1 हजार 900 क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. याशिवाय पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने जिल्ह्यातील दोन वाहतुकीचे मार्ग सुद्धा बंद करण्यात आले आहेत. यामध्ये एका राज्यमार्गाचा आणि एका जिल्हा मार्गाचा समावेश आहे.
पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे. कासारी नदीवरील- यवलूज, वेदगंगा नदीवरील-वाघापूर, कुरणी, सुरूपली, बस्तवडे व चिखली, वारणा नदीवरील -माणगाव व चिंचोली. दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, बाचणी, सुळंबी, तुरंबे, कसबा वाळवे, सुळकुड व दत्तवाड असे एकूण 26 बंधारे पाण्याखाली आहेत.