कोल्हापूर -जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वाढती संख्या लक्षात घेता, कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागामार्फत खेडोपाड्यात कोरोना अँटिजन चाचणीचा धडाका सुरू केला आहे. दररोज 10 ते 15 हजारांहून अधिकांच्या चाचण्या केल्या जात असून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहेत. अनेक गावांत तर लसीकरणाला ज्या पद्धतीने रांगा लावत आहेत, त्याच पद्धतीने कोरोना चाचणीसाठी नागरिक रांगा लावत असल्याचे चित्र आहे. गेल्या 10 दिवसांत जवळपास 2 लाख चाचण्या घेण्यात आल्या असून त्यामध्ये सुमारे 15 हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
कोरोना रुग्णांच्या संख्येवर एक नजर
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 10 लाख 96 हजार 332 जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 1 लाख 55 हजार 758 जणांना कोरोनाची लागण झाली असून 1 लाख 38 हजार 694 जणांनी कोरोनावर मात केली आहे. या दीड वर्षात तब्बल 4 हजार 712 जणांचा कोरोनाने बळी घेतला असून सद्यस्थितीत 12 हजार 352 सक्रिय रुग्ण आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध ठिकाणी हे रुग्ण उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे एकूण 1 लाख 55 हजार 758 रुग्णांपैकी 86 हजार रुग्ण हे केवळ मे आणि जून महिन्यात वाढले आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्याही केल्या असल्याचे समोर आले आहे.
गेल्या एक आठवड्यापासून 10 ते 15 हजारांहून अधिकांच्या चाचण्या
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर दररोज चाचण्या वाढवल्या जात आहेत. यासाठी जिल्ह्यातील दुर्गम भागासह अनेक खेडोपाड्यात जाऊन आरोग्य विभागाकडून कोरोना चाचण्या घेतल्या जात आहेत. यामध्ये गेल्या 21 जूनपासून दररोज 15 हजारांहून अधिक कोरोना चाचण्या होत असून या 9 दिवसांत तब्बल 1 लाख 86 हजार 131 कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यामध्ये 13 हजार 358 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या असून चाचण्यांवर भर देण्यात आली आहे.