कोल्हापूर- शहर आणि परिसरात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. ११ घरफोडीच्या गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह, चार चाकी गाडी, रिव्हॉल्व्हर, १३ जिवंत काडतुसे असा सुमारे २७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. प्रशांत करोशी आणि अविनाश आढवकर अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
लॉकडाऊनच्या काळात घरफोडीसारखे गुन्हे घडू नयेत, यासाठी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची माहिती घेतली जात होती. यादरम्यान, याआधीही घरफोडीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला प्रशांत करोशी (इस्पुर्ली, ता.करवीर, कोल्हापूर) हा चोरीची गाडी घेऊन कोल्हापुरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. पोलिसांनी त्याला शिये फाटा परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडील गाडीची झडती घेतली असता, गाडीमध्ये हायड्रॉलिक जॅक, ऑक्सिजन सिलेंडर सेट, कटावणी असे चोरी करण्यासाठीचे साहित्य मिळून आले. अधिक तपासादरम्यान त्याने आपला मित्र अविनाश शिवाजी आडवकर (धामणे, ता.आजारा, कोल्हापूर) याच्या मदतीने घरफोडी केली असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगार प्रकाश बांदिवडेकर याच्या घरावर डल्ला मारत त्याची रिव्हॉल्वर व जिवंत काडतुसे लंपास केली होती. प्रशांत करोशी याने काही दिवसांपूर्वी पुणे येथून हायड्रॉलिक जॅक खरेदी केला होता. ज्याच्या साहाय्याने तो कोल्हापुरातील बँक फोडण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता कोल्हापूर जिल्ह्यातील जुना राजवाडा, करवीर, राजारामपुरी व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण अकरा घरफोडी चोरी व चोरीचे गुन्हे केले असल्याचे समोर आले.