कोल्हापूर- कर्जमाफीचे आमिष आणि अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन अभियांत्रिकीच्या तरुणीवर बलात्कार करणारा संशयित सावकार हरिष स्वामी याच्या दोन फरारी साथीदारांना अटक करण्यात आली आहे. सद्दाम सत्तार मुल्ला (वय २९, यादवनगर), आशिष शिवाजी पाटील ( वय २८, रा. अंबाई डिफेन्स कॉलनी) अशी त्यांची नावे आहेत. यानंतर मुख्य संशयित सावकार हरिष स्वामीने कीटकनाशक सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याची माहिती मिळताच खबरदारी म्हणून पोलिसांना देखरेखीसाठी रुग्णालयात पाचारण करण्यात आले आहे. हरिष स्वामीला डिस्चार्ज मिळताच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
काय आहे हे नेमके प्रकरण -
यातील पीडित तरुणीचा पुण्यातील तरुणाशी सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. घरातून विरोध झाल्याने दाम्पत्याने कोल्हापुरात भाड्याने खोली घेतली. संसारोपयोगी खर्चासाठी दाम्पत्याला पैशांची गरज भासली. यावेळी पतीने रूईकर कॉलनीतील संशयिताकडून महिन्याला साडेतीन हजार रुपये व्याज याप्रमाणे ३० हजार रुपयांचे कर्ज घेतले. व्याजाचे तीन हप्त्याचे साडेदहा हजार रुपये परत केल्यानंतर पुढील रक्कम देण्यास दाम्पत्यासमोर अडचणी निर्माण झाल्या. सावकार कर्ज वसुलीच्या निमित्ताने दाम्पत्याच्या घरी सतत येऊ लागला. पती, पत्नीला शिवीगाळ, मारहाण करणे असे प्रकार त्याने सुरू केले. महिन्यापूर्वी रात्रीच्या सुमाराला सावकार महिलेच्या घरी आला. त्याने तिला घरातून बाहेर बोलावून घेतले. त्यानंतर त्याने पतीची चौकशी केली. पती कामावर गेल्याचे समजताच सावकाराने महत्त्वाचे काम आहे, असे सांगून तिला मोटारीतून कळंबा रोडवरील तपोवन मैदानावर नेले. तेथे बिअर पिऊन मोटारीत बलात्कार केला. त्यानंतरही दहशत माजवून तीन ते चारवेळा अत्याचार केल्याचे तरुणीने जबाबात म्हटले आहे. शिवाय या प्रकरणातील संशयित सावकार हरिष स्वामी व त्याचे मित्र आशिष पाटील, सद्दाम मुल्ला यांनी तुझी अश्लील व्हिडिओ क्लीप तयार करून ती यूट्यूबर व्हायरल करण्याची धमकी देवून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही पीडित तरुणीने सांगितले. गुन्हा दाखल केल्यानंतरही पुन्हा बलात्कार करण्याची धमकी या गुंडांनी पीडित विवाहितेला दिली आहे.
सावकारासह साथीदाराकडून होणार्या त्रासाला वैतागलेल्या तरुणीसह पतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्यवाहक गीता हसूरकर, मंगल पवार यांच्याशी संपर्क साधून अत्याचाराचा घटनाक्रम मांडला. त्यानंतर गीता हसूरकर, सीमा पवार यांनी पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर कारवाईची चक्रे गतिमान झाली.
यानंतर तीन संशयितांना गुन्हा दाखल झालेची माहिती समजताच ते पसार झाले होते. आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अभियांत्रिकी तरुणीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी चौकशी करून संशयित सावकार, साथीदारावर कठोर कारवाईचे आदेश पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांना देण्यात आले होते. त्यानुसार यातील सावकाराच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य संशयित आरोपी हरिष स्वामीने कीटकनाशक प्राशन केल्याने त्याला सीपीआरमध्ये दाखल केले असून त्याच्यावर पोलीस नजर ठेऊन आहेत. डिस्चार्ज मिळताच त्यालासुद्धा अटक करण्यात येणार आहे.