महाराष्ट्र

maharashtra

कृषी कायद्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ट्रॅक्टर रॅली

By

Published : Jan 22, 2021, 9:11 AM IST

गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना ट्रॅक्टर रॅली काढणार आहे.

Raju Shetti
राजू शेट्टी

कोल्हापूर - केंद्र सरकारने लादलेल्या कृषी कायद्याला आज(शुक्रवार) दोन महिने पूर्ण झाले. त्याच्या निषेधार्थ दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ट्रॅक्‍टर रॅलीचे आयोजन करणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी याबाबत माहिती दिली. 25 जानेवारी रोजी सांगलीतील क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते कोल्हापुरापर्यंत ही रॅली निघणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कृषी कायद्याविरोधात ट्रॅक्टर रॅली

शेतकऱ्यांनी रॅलीत सहभागी व्हावे -

गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कृषी कायदे त्वरित मागे घ्यावेत, या मागणीसाठी सलग दोन महिने ठिय्या आंदोलन सुरू असून अनेक शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले. मोदी सरकार सत्तेच्या जोरावर आंदोलन दडपू पाहत आहे. खासगी क्षेत्राच्या फायद्यासाठी हे कायदे मंजूर केले आहेत. देशभरातील शेतकरी जागा झाला असून कोणत्याही परिस्थितीत कायदे लागू होऊ देणार नाही. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने २५ जानेवारी रोजी सांगलीतून ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले आहे. तसेच लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिल माफ करू, असे आश्वासन सरकारने दिले होते. नंतर मात्र, वसुलीचा तगादा लावला, तर आम्ही सहन करणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. मी स्वतः या टॅक्टर रॅलीमध्ये सहभागी होणार असून, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले.

दिल्लीत सुरू आहे आंदोलन -

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुमारे दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करत या कायद्यांना स्थगिती दिली. मात्र, कायदे पूर्णपणे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत आपण आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे शेतकरी संघटनांनी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details