कोल्हापूर- गावठी बनावटीची पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तिघांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अलाबाद येथील नंद्याळ फाट्याजवळ अटक केली. अमोल भगवान शेंडे (वय ३०), संग्राम चंद्रकांत कुऱ्हाडे (वय ३०) व शुभम शांताराम शिंदे (वय २५) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीची पिस्तूल, तीन जिवंत राऊंड, तीन मोबाईल हँडसेट व एक मोटरसायकल. असा दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सापळा रचून केली अटक
कोल्हापूर जिल्ह्यामधील अवैध शस्त्र तस्करी रोखण्यासाठी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी एक विशेष पथक नेमले होते. या पथकाला नेसरी, गडिंग्लज येथील पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अमोल भगवान शेंडे हा नंद्याळ फाट्याजवळ गावठी बनावटीची पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती, मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचुन आरोपींना अटक केली. अटक केलेल्या तिघांना पुढील कारवाईसाठी मुरगूड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.