कोल्हापूर- राजकारण्यांऐवजी साधू संतांची लोकसभा करण्याचा भाजपचा विचार दिसतोय, अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. ते शुक्रवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना सुशीलकुमार शिंदे साध्वी प्रज्ञा सिंह यांनी भोपाळमध्ये गुरुवारी एका कार्यक्रमात हुतात्मा हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त भाष्य केले होते. हेमंत करकरे यांनी मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी माझ्याविरोधात पुरावे नसतानाही मला तुरुंगात ठेवले. त्यांनी मला सोडणार नाही, असे म्हटले होते. परंतु, मी त्यांना सांगितले, की तुमचा सर्वनाश होईल. मी खूप त्रास सहन केला. मी ज्या दिवशी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरू झाले आणि ज्या दिवशी हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांनी मारले त्यादिवशी सुतक संपले, असे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केले होते. त्यावर सुशीलकुमार शिंदे बोलत होते.
शिंदे म्हणाले, प्रज्ञा सिंह यांचे आरोप संतापजनक आहेत. त्यांनी हुतात्मा पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्यासंदर्भात केलेले वक्तव्य न शोभणारे आहे. पण ज्या पद्धतीने भाजपकडून साधू, संत आणि साधवी या सगळ्यांना एकत्रित करण्यात येत आहे, त्यावरून राजकारणांऐवजी साधू संतांची लोकसभा करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे. सोलापूरला माझ्याविरुद्ध एक साधू आणि मध्यप्रदेशमध्ये साध्वी आहे. साधू आणि साध्वी यांचे एकत्रीकरण करून लोकसभा करण्याचा हा प्रयत्न आहे, याची माझ्या मनात भीती आहे.
धर्मावर आधारित, जातीवर आधारित विचार या देशात चालणार नाहीत. आपली भारतीय घटना सर्वधर्मांची आहे, अशा पद्धतीने राजकारण भारतात चालणार नाही. कुठलाही पोलीस अधिकारी हा प्रोफेशनल काम करतो. मग ते करकरे असोत किंवा मी. पोलीस रेकॉर्डवर जे येईल ते करतात. त्यात त्यांचा काही दोष असेल, असे मला वाटत नसल्याचेही शिंदे म्हणाले.
करकरे यांनी असे केले असेल, असे मला वाटत नाही. एखाद्याला टार्गेट करायचे असेल तर भारतीय जनता पक्ष टार्गेट करतो. सरकार त्यांचेच आहे. यावर त्यांनी अपील केले नाही, असेही शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.