कोल्हापूर :कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात कार्यरत असलेल्या एका सुभेदाराकडे सुमारे अडीच किलो गांजासदृश अमली पदार्थ सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कारागृहाच्या कर्मचाऱ्याकडेच अमली पदार्थ सापडल्याने कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी सुभेदार बाळासाहेब भाऊ गेंड यांना जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सुभेदाराकडेच सापडले अमली पदार्थ : गेल्या काही दिवसांपासून कळंबा कारागृहात मोबाईल सिमकार्ड, गांजासारखे अंमली पदार्थ सापडत आहेत. मात्र, आज सुभेदाराकडेच अमली पदार्थ सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. बाळासाहेब भाऊ गेंड (वय 55) असे या सुभेदाराचे नाव असून त्याला जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी जेल कॉन्स्टेबल महेश दिलीप देवकाते यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आज, कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गेंड यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 171 ग्रॅम गांजा सदृश्य अमली पदार्थ सापडला आहे. या अमली पदार्थाची किमंत 1 हजार 710 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा गांजा प्लास्टिकच्या पिशवीत भरून खाकी रंगाच्या टेपने बांधला होता.
कळंब कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह :याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यावर कळंबा येथे संशयित गेंडच्या घराची झडती घेतली. तेव्हा 23 हजार 250 रुपये किमतीचा 2 किलो 325 ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ तसेच 50 हजार 500 रुपये रोख असा एकूण 73 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त घरात जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे कळंबा कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. यापूर्वी कैद्यांच्या ताब्यात गांजा, मोबाईल सापडले होते. मात्र, आता रक्षकाच्याच ताब्यात अमली पदार्थ सापडल्याने कळंबा कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.