महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लग्नाच्या रिसेप्शनचे आमंत्रण फक्त अपंग, निराधार, वृद्धांनाच; कोल्हापुरातील अनोखा उपक्रम - special marriage in kolhapur

कोल्हापूर म्हटलं की नेहमीच काहीतरी वेगळं, अशी ओळख आहे. अनेक उपक्रमातून कोल्हापूर कसे सर्वांपेक्षा वेगळे आहे, याची वारंवार प्रचिती येत असते आणि आता या लग्नाच्या स्वागत समारंभामुळे कोल्हापूरची अशीच चर्चा सुरू आहे.

कोल्हापूर

By

Published : Nov 3, 2019, 2:44 PM IST

कोल्हापूर - आजपर्यंत अनेक भन्नाट, अफलातून आणि शाही लग्न सोहळे झालेले आपण पाहिले असतील. पण कोल्हापुरात शनिवारी एका लग्नाचा आगळा-वेगळा स्वागत समारंभ पार पडला. ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात या सोहळ्याची चर्चा पाहायला मिळाली. कोल्हापूर म्हटलं की नेहमीच काहीतरी वेगळं, अशी ओळख आहे. अनेक उपक्रमातून कोल्हापूर कसे सर्वांपेक्षा वेगळे आहे, याची वारंवार प्रचिती येत असते आणि आता या लग्नाच्या स्वागत समारंभामुळे कोल्हापूरची अशीच चर्चा सुरू आहे.

लग्नाच्या रिसेप्शनचे आमंत्रण फक्त अपंग, निराधार, वृद्धांनाच; कोल्हापुरातील अनोखा उपक्रम

मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करणाऱ्या कोल्हापुरातील बिजू बागवान यांच्या मुलाचा नुकताच निपाणी येथे लग्नसोहळा पार पडला. शनिवारी या नवदाम्पत्यांचा स्वागत समारंभ कोल्हापुरात पार पडला. पण अशा पद्धतीचा स्वागत सोहळा यापूर्वी कधीही पहिला नसेल त्याला कारणही तसंच आहे. बागवान कुटुंबीयांनी हा स्वागत सोहळा अगदी थाटात केला. पण विशेष म्हणजे सोहळ्याचे केवळ सामाजिक संस्थांनाच आमंत्रण देण्यात आले होते.

हेही वाचा -बेळगाव काळा दिवस : मूक सायकल फेरीमध्ये मुश्रीफ आणि राजेश पाटीलसुद्धा होणार सामील

यामध्ये अपंग, निराधार, वृद्ध लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थांचा आणि तिथल्या अपंग, निराधार, वृद्धांचाच समावेश होता. कुटुंबातील केवळ मोजक्याच सदस्यांना या सोहळ्याला आमंत्रण देण्यात आले होते. आमंत्रित केलेल्या अपंग, निराधार आणि वृद्ध पाहुण्यांचे स्वागत करण्यात सुद्धा बागवान कुटुंबीयांनी कसलीही कमी ठेवली नाही. अगदी ढोल-ताशा, तुतारीच्या निनादात वाजत-गाजत त्यांचे कार्यक्रमस्थळी स्वागत करण्यात आले. त्यांच्यासाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे या मुलांनी लग्नामध्ये विविध गाण्यांवर डान्स सुद्धा केला. अशा प्रकारच्या स्वागत आणि आदरातिथ्याने या मुलांना झालेला आनंद यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

हेही वाचा -भाजपच्या उमेदवाराचा पराभव करणाऱ्या प्रकाश आवाडेंचा भाजपलाच पाठिंबा

आपले नातेवाईक नेहमीच एकमेकांना भेटत असतात. पण अशा प्रकारच्या सामाजिक संस्थांमधल्या मुलांना कुठल्याही समारंभात, सोहळ्यात जाता येत नाही. त्यामुळे हा सोहळा स्पेशल बनवायचा होता, म्हणून या सर्वांनाच आपण सोहळ्याला आमंत्रण दिले, असे बागवान कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

या आगळ्या वेगळ्या लग्नाच्या स्वागत सोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अंध, अपंग, निराधार मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य बागवान कुटुंबीयांना समाधान देऊन गेले. तर बागवान कुटुंबीयांकडून मिळालेल्या या प्रेमाने निरागस मुलेही भारावून गेलीत.

ABOUT THE AUTHOR

...view details