कोल्हापूर -पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील जवानाला वीरमरण आले आहे. ऋषीकेश रामचंद्र जोंधळे (वय 20) असे शहीद झालेल्या जवानाचे नाव असून ऐन दिवाळीत ऋषीकेश शहीद झाल्याची माहिती समजताच त्याच्या कुटुंबीयांवर आणि गावावर शोककळा पसरली आहे. ऋषिकेशची पहिलीच नेमणूक जम्मू येथे झाली होती. मात्र, आज पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीत ऋषिकेशला शत्रुशी लढताना वीरमरण आले.
प्रशिक्षणानंतर पहिलीच नेमणूक जम्मूला
यावर्षी 11 जूनला सुट्टी संपवून तो जम्मू येथे कर्तव्यावर हजर झाला होता. 2018 साली कोल्हापूर बीआरओ 6 मराठा मध्ये ऋषिकेश भरती झाला होता. त्यानंतर बेळगाव येथे त्याने 9 महिन्यांचे प्रशिक्षण घेतले होते. त्यांच्या पाठीमागे आई, वडील आणि 1 लहान बहीण आहे. कोल्हापूरातील जवान शहीद झाल्याची माहिती मिळताच संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
पाकिस्तानी लष्कराने आज (शुक्रवार) जम्मू काश्मीरातील उरी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताच्या ३ जवानांना वीरमरण आले. यातील २ जवान उरी सेक्टरमध्ये आणि एक जवान गुरेज सेक्टरमध्ये शहीद झाले. भारताने प्रत्युत्तर दाखल जोरदार गोळीबार केला. यात पाकिस्तानचे सात ते आठ जवान ठार झाल्याची माहिती लष्करातील सूत्रांनी दिली आहे.